Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरी प्रकरणी रेल्वे पोलिसांनी बोदवडच्या चौघांना घेतले ताब्यात

बोदवड प्रतिनिधी । अकोला येथील रहिवासी नईम काजी यांचे १ लाख ८० हजार रूपयांची रोकड असणारे पाकीट चोरल्या प्रकरणी नागपूर रेल्वे पोलिसांनी बोदवड येथील चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी कि अकोला येथील नईम काजी हे हज यात्रेला जाण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नागपूर येथे आले होते. तपासणी करून घराकडे परतत असताना मोमीनपूरा येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले. जेवण करत असताना बाजूच्या बाकावर बसलेल्या काही जणांनी त्यांच्यावर पाळत ठेवत त्यांचा स्टेशन पर्यंत पाठलाग केला. नईम काजी हे रेल्वे स्टेशनवर आले असता चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १ लाख ८० हजाराची रोकड लांबविली.

याप्रकरणी नागपूर रेल्वे पोलिसात कलम ३७९,३४, ४११, प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी नागपूर पोलिसांचे, पथक शुक्रवारी २ रोजी बोदवड शहरात आले होते. त्यांनी बोदवड पोलिसांची मदत घेऊन पहाटे सहा वाजता शहरातील सतरंजी मोहोल्ला भागात धाड टाकून या भागातील चार संशयित तरुणांना चौकशी साठी ताब्यात घेतले. त्यातील एक संशयित आदिलशहा असून जाबिर, शब्बीर, सद्दाम अशी इतर आरोपींची नावे असून त्यांना संशयावरून ताब्यात घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यानंतर संशयितांना भुसावळ येथे अधिक चौकशीसाठी नेण्यात आले. ही कारवाई नागपूर रेल्वे पोलीस पथकातील एम.शेख, थॉमस व शेळके आदींचा केली असून त्यांना बोदवड पोलिसांनी तपासासाठी मदत केली.

Exit mobile version