Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल अडचणीत ; ईडीने बजावले समन्स

Praful Patel

 

मुंबई (प्रतिनिधी) हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी (एव्हिएशन घोटाळ्याप्रकरणी) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना ईडीने समन्स बजावले असून त्यांना येत्या ६ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीने समन्स बजावल्याची माहिती मिळताच पटेल यांनी राष्ट्रवादीची बैठक अर्धवट सोडली.

आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले, असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. दीपक तलवार हा माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता, असे देखील न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे पटेल यांचीही या घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितले.

Exit mobile version