Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना-भाजप युती ‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी : नारायण राणे

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपा-शिवसेनेची युती ही जनतेसाठी नव्हे तर वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मातोश्रीच्या बचावासाठी असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. युती सडली होती असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणत होते. मग ते पुन्हा एकत्र का आले. या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होणार नाही. युतीला २५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली. तसेच शिवसेनेच्या पराभवासाठी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष प्रयत्न करेन असा इशाराही त्यांनी दिला.

 

गेली साडेचार वर्षे एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपने काल आगामी निवडणुकांसाठी पुन्हा एकदा युतीची घोषणा केली आहे. या युतीमुळं शिवसेनेचे कडवे विरोधक असलेल्या, मात्र भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेल्या नारायण राणे यांनी गोची झाल्याची चर्चा होती. नारायण राणे आता काय करणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांची पुढील भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. युतीच्या निर्णयावरही त्यांनी जोरदार टीका केली. ‘शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत. शिवसेनेने दिलेली वागणूक व केलेली टीका भाजपचे कार्यकर्ते विसरलेले नाहीत. युतीच्या घोषणेमुळं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठंही उत्साह दिसला नाही. घोषणा झाल्यावर सगळे आपापल्या घरी गेले. ही युती केवळ नेत्यांच्या समाधानासाठी आहे. दोन्ही पक्षांना याचा काहीही फायदा होणार नाही,’ असेही त्यांनी सांगितले. काल पत्रकार परिषदेत कुठेच उत्साह दिसून आला नाही. तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना या पलीकडे काही नाही. देशात सर्वाधिक भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत झाला आहे. हा भ्रष्टाचार पचवण्यासाठी सत्ता पाहिजे म्हणून त्यासाठी हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. ही युती नेत्यांच्या समाधानासाठी आहे. यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

Exit mobile version