Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एनडीएच्या दीक्षान्त संचलनात प्रथमच मुलींच्या बटालियनने दिली मानवंदना

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । गुरुवारचा सूर्योदय हा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) वाटचालीत एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला. पहाटेच्या गुलाबी थंडीत बिगूल वाजल्यानंतर ‘एनडीए’तील ‘क्वाटर डेक’चा दरवाजा उघडला अन् विविध सुरावटींच्या तालावर संचलन करत खेत्रपाल मैदानावर लष्करी बँडचे आगमन झाले.

त्यापाठोपाठ सुरू झालेल्या छात्रांच्या शिस्तबद्ध संचलनाने एका ऐतिहासिक घटनेची नोंद केली. ‘एनडीए’च्या ७५ वर्षांच्या वाटचालीत प्रथमच मुलींची बटालियन दीक्षान्त संचलनात सहभाग झाली. ज्याची दखल खुद्द राष्ट्रपतींनी घेत, ही घटना ऐतिहासिक असल्याचे जाहीर केले. मैदानावर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आगमनानंतर राज्यपाल रमेश बैस यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर रुबाबदार घोड्यांच्या शानदार बग्गीमधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे खेत्रपाल मैदानावर आगमन झाले.

छात्रांची मानवंदना स्वीकारत त्यांनी लष्करी वाहनातून संचलनाची पाहणी केली. यानंतर पदवी प्राप्त केलेल्या आणि दुसऱ्या वर्षातील कॅडेटनी दिमाखदार संचलन करत प्रशिक्षणातील उत्तुंग कामगिरी दाखवून दिली. त्यात १५ महिला छात्रांच्या संचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अखेर तीन वर्षे प्रबोधिनीतील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम पग’ ओलांडत जल्लोष केला. चेतक हेलिकॉप्टर, जॅग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.

समारंभाला सरसेनाध्यक्ष अनिल चौहान, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह, एनडीए कमांडंट व्हॉइस ॲडमिरल अजय कोचर, चीफ इन्स्ट्रक्टर संजीव डोग्रा उपस्थित होते. १४५व्या तुकडीत एकूण ३५३ छात्रांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले.

Exit mobile version