Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यात प्रथमच सक्रीय रुग्ण संख्या शंभरच्या आत

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील सक्रिय रूग्ण संख्या प्रथमच 100 च्या खाली म्हणजेच 94 वर आली असून आजपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या 1 लाख 42 हजार 555 रुग्णांपैकी 1 लाख 39 हजार 886 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्क्यांवर पोहोचले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असली तरी यापुढेही नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी प्रशासनाने राबविलेल्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान व इतर उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्यावर पोहोचले होते. मात्र जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर 10 फेब्रुवारीपासून हे प्रमाण कमी झाले तर 31 मार्च रोजी हे प्रमाण 84.92 टक्क्यांपर्यत खाली आले होते. परंतु त्यानंतरच्या काळात जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) होण्यासाठी आरोग्य, पोलीस, जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने अधिक प्रभावीपणे उपाययोजना राबवित बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या वाढविल्या होत्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत. शिवाय मृत्यु कमी करण्यातही आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. 

जिल्ह्यात कोरोनाची साखळ खंडित होण्यासाठी आजपर्यंत 14 लाख 3 हजार 188 कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 लाख 42 हजार 555 अहवाल पॉझिटीव्ह तर 12 लाख 58 हजार 421 अहवाल निगेटिव्ह आले आहे तर सध्या 308 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही कमी होत आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत 69 व्यक्ति होम क्वारंटाईन असून 10 व्यक्ति विलगीकरण कक्षात आहेत. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 94 रुग्णांपैकी 69 रुग्ण लक्षणे नसलेले तर 25 रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी 15 रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु असून 6 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

 

Exit mobile version