Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवेंद्र मराठे यांचा पाठपुरावा : परिवहन मंत्र्यांची उमेदवारांची सेवा खंडित नाही तर स्थगित केल्याची माहिती

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी परिवहन मंत्रालयाने महाराष्ट्र राज्यातील एसटी महामंडळाच्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांची सेवा खंडीत करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाच्या विरोधात “परीक्षार्थी उमेदवारांची सेवा खंडित करू नये” या प्रकारची मागणी करून परिवहन मंत्री ना.अनिल परब यांच्याशी आज सकाळी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली.

महाराष्ट्र राज्यामध्ये परीक्षणार्थी ३२०० उमेदवार असून त्यामध्ये जळगाव विभागातील १७१ परीक्षार्थी उमेदवारांचा समावेश आहे. तसेच उर्वरित १३०० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ते नुकतेच महामंडळाच्या कायमस्वरूपी सेवेत दाखल झाले होते. तसेच या शिवाय सरळ सेवा भरती अंतर्गत लिपिक टंकलेखक, चालक-वाहक, राज्य संवर्ग अधिकारी व अनुकंपा तत्त्वावरील महामंडळाच्या सेवेत आलेल्या अशा संपूर्ण परीक्षणार्थी उमेदवारांची सेवा स्थगित करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने जळगाव विभागातील परीक्षणार्थी उमेदवारांनी जळगाव जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. त्यानुसार जिल्हाध्यक्ष मराठे यांनी परिवहन मंत्र्यांशी चर्चा करून सदर “परीक्षणार्थी उमेदवारांची सेवा खंडित करू नये व जळगाव विभागातील परिक्षणार्थी उमेदवार जो पर्यंत महाराष्ट्र राज्याची आर्थिक घडी सुव्यवस्थित स्थितीमध्ये बसत नाही तो पर्यंत बिनपगारी महामंडळ सेवक म्हणून काम करण्यास तयार आहेत.त्यामुळे अशा सर्व उमेदवारांना तात्काळ नोकरीमध्ये रुजू करावे व त्यांची कुठलीही सेवा खंडित करू नये” अशा प्रकारची चर्चा केली. यास सकारात्मक प्रत्युत्तर देत ना. परब म्हणाले की, “जसे जसे एसटीचे चाके सुरू होतील तशी तशी परीक्षार्थी उमेदवारांची सेवा देखील सुरू होईल. सध्या राज्यामध्ये एसटी महामंडळामध्ये काम नसल्यामुळे व एसटी महामंडळाचे उत्पन्न थांबल्यामुळे आर्थिक बोजापोटी परीक्षणार्थी उमेदवारांची नियुक्ती स्थगित केली होती. कुठल्याही उमेदवाराची सेवा खंडित होऊ देणार नाही अशा प्रकारचे सकारात्मक उत्तर देऊन परिवहन मंत्री ना. परब यांनी राज्यातील परीक्षणार्थि उमेदवारांना दिलासा दिला.

Exit mobile version