Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नियम पाळा अन्यथा कठोर कारवाई अटळ !: मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर आज नवीन नियमावली जाहीर करतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन करून नियम पालन करण्याचे आवाहन केले आहे.

आज राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. यासोबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे. या संदर्भात ते म्हणाले की, कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. याचमुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचं नाही. आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही. पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे. त्यामुळे लोकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाला सहकार्य करत नियमांचं पालन करावं. काही मूठभर लोकांच्या नियम न पाळण्याच्या वृत्तीमुळं आणि बेजबाबदार वागण्यामुळं प्रश्न निर्माण होतो. यापुढे असं चालणार नाही. नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना, आणि पोलिसांना दिले आहेत, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

आपण शाळा- महाविद्यालये परत ऑनलाईन केली आहेत. शिक्षण थांबणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळं आपल्याला मिळालेली ही सुट्टी आहे असं समजून इकडे तिकडे अनावश्यक फिरून कोरोनाचे दूत बनू नका असेही आवाहन मी माझ्या तरुण मित्रांना करतो, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. तसंच लसीकरणावर जास्तीत जास्त भर द्यायला हवा, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version