Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव विमानतळावर होणार उड्डाण प्रशिक्षण केंद्र

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने देशभरात आठ उड्डाण (वैमानिक) प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा केली असून यात जळगाव विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आता जळगावात वैमानिकांना प्रशिक्षण मिळणार आहे. या माध्यमातून जळगाव हवाई उड्डाण क्षेत्राच्या नकाशावर येणार आहे.

याबाबत वृत्त असे की, केंद्र शासनाच्या नागरी उड्डयण मंत्रालयाने आज देशात आठ नवीन उड्डयन प्रशिक्षण अकादमी सुरू करण्याची घोषणा केली आहे. यात जिल्हावासियांसाठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे जळगाव विमानतळाचा यात समावेश करण्यात आला आहे. अर्थात, जळगाव विमानतळावर लवकरच उड्डाण प्रशिक्षण अकादमी स्थापन होणार असल्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जळगावसह बेळगाव, कलबुर्गी, खजुराहो आणि लिलाबारी या ठिकाणी एकंदरीत आठ अकादमी सुरू करण्यात येणार असल्याचे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने आज जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

जळगावसह वर नमूद केलेल्या अन्य विमानतळांवर देशातील अन्य एयरपोर्टच्या तुलनेत कमी प्रमाणात वाहतूक असून हवामान वा लष्करी कारणांमुळे येथील हवाई वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता जळगावात वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. या प्रकरणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.

या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने खासदार उन्मेषदादा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होण्याचा निर्णय हा जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. यासाठी आपण दोनदा केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेऊन त्यांना जळगाव विमानतळावरील उपलब्ध सुविधांची माहिती देऊन येथे उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू करण्याची विनंतीवजा मागणी केली होती. त्यांनी अनुकुलता दर्शविल्यानंतर जळगाव विमानतळाला यासाठीच्या निकषात बसविण्याची तयारी करण्यात आली. यात प्रामुख्याने नाईट लँडींगला परवानगी मिळवून देण्यात आली. यानंतर उड्डाण प्रशिक्षण केंद्रासाठीची निवीदा काढण्यात आली. यात तीन कंपन्यांनी निविदा सादर केली. यामध्ये जळगावच्या विमानतळावर स्कायनेक्स या कंपनीला प्रशिक्षण अकादमी सुरू करण्याचे काम प्रदान करण्यात आले असून याला लवकरच प्रारंभ होणार आहे.

जळगाव विमानतळावर उड्डाण प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यासाठी आपण स्वत: पाठपुरावा केला असून यासाठी आपल्याला खासदार रक्षाताई खडसे यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना सांगितले.

Exit mobile version