पहूर, ता . जामनेर, प्रतिनिधी | जगप्रसिद्ध अजिंठा लेणींच्या कुशीतुन उगम पावलेल्या वाघूर नदीस डोंगररांगेत झालेल्या दमदार पावसामुळे आज मोठा पूर आला. कार्तिक महिन्यातही श्रावण महिन्यासारखी पावसाची रिपरिप सुरू असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
आज वाघूर नदीच्या पुराने नदी पात्रातील अतिक्रमित केलेल्या काही दुकानांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. तर पहूर कसबे येथील शनी मंदिराच्या पायथ्याला पुराचे पाणी लागले. तर कसबे येथील वाघूर नदी पात्रातील मटण मार्केटलाही पुराच्या पाण्याने वेढा घातला असून नदीकाठच्या घरांनाही पाणी लागल्याने गावकरी भयभीत झाले आहे.
स्मशान भुमीसही पाण्याचा वेढा
यंदा पहूर सह परीसरात गेल्या दहा वर्षांत झाला नाही येवढा पाऊस या वर्षी होत आहे. त्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात यंदा प्रथमच वाघूर नदी खळाखळा ओसंडून वाहत आहे. तर वाघूर नदी पात्रालगत असलेल्या स्मशान भुमीही पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. तर सततधार पावसाने परिसरात असलेल्या सर्व नाले, आड,शेतातील विहिरी, या ओसंडून वाहत आहे. तर वाघूर नदीचे पात्रालगत असलेल्या एक हात पंप आपोआप ओसंडून वाहत आहे. तब्बल वीस ते पंचवीस वेळेस वाघूर नदीला पुर आला असला तरीही आजचा वाघूर नदिस आलेला पुर खुप मोठा आहे. येन दिवाळीच्या दिवशीही वाघूर नदिस मोठा पूर आला होता. त्या पुराच्या पाण्यातहिवरी, हिवरखेडा, पिंपळगाव येथील अनेक गुरे, ढोरे वाहून गेले. पुर पाहण्यासाठी वाघूर नदीच्या पुलावर गावकऱ्यांनी पुलाच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती.पहूर व परिसरात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे अंतोनद नुकसान झाले असून त्यामध्ये कपाशी ज्वारी मका, तसेच भाजीपाला व ईतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशी, ज्वारी, मका पिकांना कोम आले आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरी पणामुळे व सततधार पावसाने हिरावून घेतला आहे.
वाघूर नदीवरील पुलाचे वाजले बारा
जळगांव -औरंगाबाद महामार्गालगत वाघूर नदीच्या पुलाचे ही बारा वाजले आहेत. याजीर्ण झालेल्या पुलास तब्बल ५० वर्ष पूर्ण होत आले असून आज पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पुलास अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलाचे कठडेही तुटले आहे. तर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले असून पुलाची आसारी दिसत आहे. पुलावरून अवजड वाहन गेल्यास पुल थरारत आहे. मोठा अनर्थ होवू नये यासाठी नुसती पुलाची डागडुजी न करता लवकरात लवकर पुलाचे काम करावे अशी मागणी होत आहे.
गोगडी नदीवरील साठवण बंधारा फुटला
संततधार व अवकाळी पावसाने गोगडी नदीवरील सिमेंटचा साठवण बंधारा फुटल्यामुळे आजूबाजूच्या शेतातील उभी पिके व माती वाहून गेली. दहा वर्षांपूर्वी हा सिमेंटचा साठवण बंधारा बांधण्यात आला होता. गेल्या वीस दिवसातून अवकाळी पावसाने हा सिमेंटचा साठवण बंधारा फुटल्यामुळे तरी हा साठवण बंधारा त्वरित दुरूस्ती करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ओला दुष्काळ जाहीर करा
या वर्षी कधी नव्हे एवढा पाऊस होत असून जामनेर तालुक्यासह पहूर परिसरात संततधार व मुसळधार पाऊस होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व पिकांचे १००% नुकसान झाले असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वाना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी माजी जि.प.कृषी सभापती प्रदीप लोढा यांनी केली आहे.