Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मु.जे.महाविद्यालयात १३ व १४ ऑगस्टला पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन

sahitya sanmelan

 

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मुळजी जेठा महाविद्यालय,जळगाव यांच्या संयुक्त  विद्यमाने दि.१३ व १४ ऑगस्ट  रोजी पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिल्यानंतर या प्रकारचे हे पहिलेच संमेलन होत आहे.

 

गतवर्षी ऑगस्ट मध्ये विद्यापीठाचा नामविस्तार झाला. बहिणाबाईंच्या साहित्याचा वारसा चिरंतन टिकावा यासाठी विद्यापीठाने विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्याचे घोषित केले होते. त्यानुसार मु.जे.महाविद्यालयात १३ व १४ ऑगस्टला हे पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन होणार आहे. राज्यात या प्रकारचे विद्यार्थी साहित्य संमेलन प्रथमच होत आहे.

 

दोन दिवसाच्या या संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, तीन परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, व मुलाखत असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची निवड फेरी घेण्यात येईल. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यीक विद्यार्थ्यांच्या साहित्याची निवड करतील. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी आपली कला सादर करतील. या संदर्भात विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना परिपत्रक पाठवून साहित्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज मागविले आहेत.

 

या संमेलनाचे प्रारुप ठरविण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये विद्यार्थी विकास संचालक डॉ. सत्यजित साळवे, ‍दिनेश नाईक, निरज देशपांडे, अशोक कोतवाल, बी.एन.चौधरी, संजीवकुमार सोनवणे, प्रा. पुष्पा गावित, प्रा. लतिका चौधरी उपस्थित होते. कला गुणांना वाव देणारे युवामहोत्सव प्रत्येक विद्यापीठांत होत असतात मात्र पुर्णपणे साहित्याला वाहिलेले आणि विद्यार्थी केंद्रस्थानी असलेले साहित्य संमेलन घेणारे हे एकमेव विद्यापीठ असेल अशी भावना दिलीप पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version