Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आधी साठ आमदार तर निवडून आणा ! : भाजपचे पवारांना आव्हान

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इतर प्रादेशिक पक्षांनी १० वर्षांत दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात, असा टोला मारत आपण आधी साठ आमदार तर निवडून आणा असे आव्हान शरद पवार यांना दिले आहे.

काल झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण भाजपाचा पुन्हा राज्यात सत्तेत येऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला होता. पवारांच्या याच विधानाला आता भाजपाकडून खोचक शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तुमच्या पक्षाचे ६० पेक्षा जास्त आमदार निवडून आणून दाखवा, अशा शब्दांत भाजपानं शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

या संदर्भात करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आदरणीय शरद पवार साहेब..कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला १०५ जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणार्‍यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल, अशा शब्दांत महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हँडलवरून शरद पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे.

दरम्यान, दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शरद पवार साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे ६० च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी १० वर्षांत दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा, असं आव्हान भाजपानं शरद पवारांना दिलं आहे. यावेळी आपनं पंजाबमध्ये मिळवलेल्या विजयावरून देखील भाजपानं शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

यासोबत करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये शरद पवारांना राज्यातील तीन प्रलंबित प्रश्नांबाबत देखील विचारणा करण्यात आली आहे. आदरणीय शरद पवारजी, भाजपाला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. राज्यात एसटी बंद, ६ महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत. राज्यात शेतकर्‍यांची वीज तोडली जात आहे, पिकं उभ्या उभ्या करपून जात आहेत. मराठा, ओबीसी आरक्षण.. आधी हे प्रश्न सोडवून दाखवा, असं भाजपाच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

Exit mobile version