Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नेरूळ येथे राज्याचे पहिले डिटेंशन सेंटर

mumbai 1

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील बेकायदेशीर स्थलांतरितासांठी (घुसखोर) नवी मुंबईतील नेरूळ येथे महाराष्ट्रातील पहिले डिटेंशन सेंटर उभारण्यात येत आहे. डिटेंशन सेंटरसाठी राज्याच्या गृह विभागाने गेल्याच आठवड्यात सिडकोला पत्र पाठवले होते. सेंटरसाठी जागेची निवड झाली असून नेमकी जागा कोणती याबाबत गृह विभागातील सूत्रांनी माहिती देण्यास नकार दिला आहे.

सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, डिटेंशन सेंटरसाठी नेरूळमध्ये तीन एकर जागेची मागणी केली आहे. या जागेवर सध्या एक भवन असून एक सामाजिक संस्था तिचा वापर करत असल्याची माहिती मिळतेय. डिटेंशन सेंटरसाठी जागा निवडण्याची प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू करण्यात आली होती. गेल्या रविवारी शिवेसेनेचे खासदार आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी मुंबईत एनसीआर लागू करण्याची मागणी केली होती. मुंबईत मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसघोर राहत असल्याची माहिती एका प्रशासकीय अधिकाऱ्याने दिली. या घुसखोरांना त्यांच्या देशात पाठवण्याच्या प्रक्रियेला वेळ लागेल आणि याच कारणासाठी डिटेंशन सेंटरची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. सध्या काही घुसखोरांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. नेरूळमध्ये प्रस्तावित डिटेंशन सेंटर तुरुंगासारखे असणार नाही. यात ठेवण्यात येणाऱ्या घुसखोरांना अनेक प्रकारच्या सोयीसुविधा पुरवण्यात येतील अशी सूत्रांची माहिती आहे. इथे एकाच कुटुंबातील लोकांना एकत्र ठेवण्यात येणार आहे. तसेच सेंटरमध्ये पाळणाघरही असणार आहे. आसाममध्ये नुकतीच राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आसाममध्ये सुमारे १९ लाख लोक यादीबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version