Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपमधील हाणामारीचा वाद पोलिसात !


अमळनेर प्रतिनिधी । भाजपच्या आज झालेल्या मेळाव्यातील हाणामारीचा वाद पोलिसात गेला असून जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या समर्थकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आज येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांना मारहाण केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यात डॉ. पाटील यांना दुखापत झाली असली तरी त्यांनी पहिल्यांदा पोलीसात तक्रार न देण्याचे सूतोवाच केले होते. मात्र रात्री त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली. यावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि शीतल देशमुख, राजेश वाघ, पंकज पवार, देवा लांडगे, एजाज बागवान व संदीप वाघ या त्यांच्या समर्थकांच्या विरोधात भाग ५, भादंवि कलम १४३, १४७, १४९, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, पंचायत समिती सभापती वजाबाई भिल यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यावर रात्री उशीरा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. वजाबाई भील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २० मार्च रोजी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी सभापती भील यांचा पीए भूषण जैन यांच्या भ्रमणध्वनीवर फोन केला. त्यांनी सांगितले, की खासदारकीची उमेदवारी मिळण्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी सभापतींना घेऊन ये, मात्र मी गेली नाही म्हणून त्याचा त्यांना राग आला. १० रोजी प्रचार सभेत येताना त्यांनी माझ्याकडे पाहून जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला माजी आमदार डॉ. पाटील यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version