Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन मंत्र्यांनी दाखविल्या तलवारी : गुन्हा दाखल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय गोंधळातच राज्यातील दोन मंत्र्यांनी एका जाहीर कार्यक्रमात तलवारी दाखविल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात तलवारी दाखवून शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह कॉंग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्याविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात रविवारी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी, वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. इम्रान यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणलेल्या तलवारी मंचावरील मान्यवरांनी उंचावून दाखवल्या. जाहीर कार्यक्रमामध्ये शस्त्रांचे प्रदर्शन म्हणजे शस्त्रबंदीचे उल्लंघन असल्याने वांद्रे पोलिसांनी या कृत्याची दखल घेऊन गायकवाड, शेख आणि इम्रान यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला.

काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपचे मोहीम कंबोज यांनी तलवार दाखवून आनंद साजरा केला होता. त्या वेळेस त्यांच्यावरही सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता याच प्रकारे तलवारींचे जाहीर प्रदर्शन हे राज्यातील दोन मंत्र्यांना अडचणीत आणणारे ठरले आहे.

Exit mobile version