Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : सोमय्या पिता-पुत्राच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आयएनएस विक्रांत या युध्दनौकेच्या नावावर कोट्यवधी रूपये जमा केल्याच्या आरोपातून किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या सुरू असलेल्या राजकीय धुमश्‍चक्रीमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत या युध्दनौकेला वाचविण्याच्या नावाखाली कोट्यवधी रूपये जमा केले असून त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली होती. सोमय्या यांनी या आरोपाचा लागलीच इन्कार केला होता. मात्र, आता याच प्रकरणी सोमय्या पिता-पुत्र गोत्यात आले आहेत.

ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ४२०, ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामुळे आता पोलीस त्यांच्या विरोधात नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या संदर्भात संजय राऊतांनी या संदर्भात आज पुन्हा एक ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, आयएनएस विक्रांतच्या नावे ५६ कोटी गोळा करून जनतेला देशाला फसवणार्‍या सोमय्या बाप बेटा यांना जेलमध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणार्‍या भाजपाला जाब विचाराच लागेल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

Exit mobile version