Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…अखेर शिवसेना-भाजपची युती अधिकृतरित्या संपुष्टात

yuti break logo

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | राज्यातील नव्या सत्ता समीकरणानंतर ताणलेल्या संबंधामुळे शिवसेना-भाजपची ३५ वर्षांची युती अखेर आज (दि.१७) अधिकृतरित्या संपुष्टात आली आहे. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा भाजपाकडूनच करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. प्रल्हाद जोशी म्हणाले की, “शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला आहे. एनडीएच्या ते बैठकीलाही आले नाहीत. त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे.”

 

विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत असताना मुख्यमंत्रीपदावरून युती फिस्कटली. मुख्यमंत्रीपद हवेच अस सांगत शिवसेनेने भाजपाला दूर सारत राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. सत्तास्थापनेसंदर्भात तिन्ही पक्षातील बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, “शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी ‘एनडीए’त राहायचे की बाहेर पडायचे यांचा निर्णय घ्यावा,” असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेससोबत जाण्यापूर्वी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडल्याची चर्चा सुरू होती. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. “शिवसेनेच्या मंत्र्यांने राजीनामा दिला आहे. त्यामुळे हवा तो अर्थ तुम्ही काढू शकता,” असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत म्हणाले होते.

Exit mobile version