Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने ब्रिटिशकालीन पुलावरील अतिक्रमणाच्या चौकशीचे दिले आदेश

पाचोरा प्रतिनिधी । येथील ब्रिटिशकालीन नाल्याचा नैसर्गिक आकारात बदल करुन नगरपरिषदची कोणतीही परवानगी न घेता चार फुट व्यासाचा हयूम पाईप टाकून बंदिस्त नाला करुन उर्वरित जागेवर अतिक्रमण करुन शासनाच्या मालकीच्या जागेवर सुरु असलेले अतिक्रमीत बांधकाम त्वरीत थांबवून चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन प्राप्त झाले आहेत.

याबाबत येथील भुषण वाघ यांनी पुढाकार घेत दि. २४ जुन २०२१ रोजी या अतिक्रमणा विरोधात आंदोलन केले होते. मात्र यावेळी संबंधित व्यावसायिकांचे व भुषण वाघ यांचे म्हणणे ऐकुन घेत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी संबंधित व्यावसायिक यांना एक महिन्याचा कालावधी दिल्यानंतर सदरील आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र एक महिना उलटुन सुद्धा संबंधित अतिक्रमणावर कुठलीच कारवाई होत नसल्याने अखेर भुषण वाघ यांनी दि. २७ जुलै २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांना याविषयी चौकशी होणेकामी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने पाचोरा नगरपालिकेच्या हद्दीत शेतकरी सहकारी संघ जवळील सिटी सर्वे. ३३२१ ते ३३३६ च्या जागेवर बांधकाम सुरु असलेल्या व्यापारी संकुलाच्या लगत असलेल्या ब्रिटिशकालीन नाल्याचा नैसर्गिक आकारात बदल करुन नगरपरिषद यांची कोणतीही परवानगी न घेता चार फुट व्यासाचा हयूम पाईप टाकून बंदिस्त नाला करुन उर्वरित जागेवर अतिक्रमण करुन शासनाच्या मालकीच्या जागेवर सुरु असलेले अतिक्रमित बांधकाम त्वरीत थांबवून चौकशी करावी. मुख्याधिकारी यांचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेनंतर आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन न. पा. प्रशासनास प्राप्त झाले असल्याने याबाबत न. पा. प्रशासन काय भुमिका घेते ? याकडे नागरिकांचे लक्ष लागुन आहे.

Exit mobile version