Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात

 

मुंबई, वृत्तसंस्था । अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबधी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. परीक्षा शक्यतो ऑनलाईन घेण्याचा विचार असल्याचंही ते म्हणाले.

राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “युजीसीकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागावी यासाठी राज्यातील अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंनी मागणी केली आहे. युजीसीने ही मागणी मान्य करावी यासाठी सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक व्हावी आणि मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवावा आणि तशी विनंती यूजीसीकडे करावी अशी सूचना कऱण्यात आली आहे”.

“मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन बुधवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर कुलगुरुंनी केलेल्या विनंतीप्रमाणे मुदतवाढ मिळावी यासाठी यूजीसीकडे विनंती करणार आहोत,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

“परीक्षा नेमकी कधी सुरु होईल अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की, आज परीक्षा जाहीर केली आणि उद्या घेतली असं होणार नाही. पूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्याासासाठी दिला जाईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. निकाल काही विद्यापीठ ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करतील. तर काही विद्यापीठ १० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करतील,” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

“विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून केंद्रावर परीक्षा द्यावी लागणार नाही यासंबंधी कुलगुरुंकडे विनंती करण्यात आली असून त्यावरही चर्चा झाली. विद्यार्थ्यांना शारिरीक आणि मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे अशी पुन्हा विनंती कऱण्यात आली. त्यानुसार पेडणेकर समिती चांगल्या पद्धतीनं काम करत असून कार्यवाही करत आहे,” असं उदय सामंत यांनी सांगितलं.

परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्या लागतील यासाठी बुधवारी बैठक होणार आहे. त्यानंतर सरकारकडे दुसरा प्रस्ताव सादर केला जाणार आहे,” “विद्यार्थी घराबाहेर पडणार नाही, घरातच परीक्षा देता आली पाहिजे यावर कुलगुरुंच एकमत झालं आहे. ७ लाख ९२ हजार ३८५ विद्यार्थ्यांची करोना संकटात परीक्षा घेणं फार जिकीरीचं काम आहे. मात्र कुलगुरु हे योग्य पद्धतीने पार पडेल याबद्दल आशा आहे,” असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

 

Exit mobile version