Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – शिवप्रेमींची मागणी

bodaval

 

बोदवड प्रतिनिधी । ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून सोनी टिव्हीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन आज शहरातील शिवप्रेमींतर्फे तहसीलदार व पोलीस उपनिरीक्षक यांना देण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, गुजरातच्या शाहेदा चंद्रन या हॉटसीटवर असताना त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला. यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजीत सिंह आणि शिवाजी असे चार पर्याय देण्यात आले होते. या पर्यायामध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. यामुळे शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे संबंधित सोनी टिव्हीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार रविंद्र जोगी व पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे यांना आज देण्यात आले.

यावेळी आबा माळी, रामदास पाटील, राहुल शर्मा, शांताराम सपकाळ, नईम खान, बाळू राउत, अजय पाटील, अनिल देवकर, संजय काकडे, अनंता वाघ, सचिन राजपुत, शांताराम कोळी, निवृत्ती ढोले, डॉ.देविदास पाटील, समाधान पाटील, अमर जाधव, असिप मन्यार, रुपेश गांधी, राजेंद्र फिरके, अमोल पाटील, सचिन जैस्वाल यांच्यासह बोदवड तालुक्यातील आदि शिवप्रेमी उपस्थित होते.

Exit mobile version