Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा : भाजप आमदाराची मागणी

मुंबई | परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे वक्तव्य केल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी करून या आशयाची तक्रार पोलीस स्थानकात केली आहे.

महाराष्ट्रात घडणार्‍या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली. ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत? मुख्यमंत्र्यांविरोधात कलम १५४अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला सामना या दैनिकात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे सामानाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले.

या राज्यात कायद्याचे राज्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र तीन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जावू, असं भातखळकर म्हणाले.

तर यावरून शिवसेनेच्या नेत्या आमदार मनीषा कायंदे यांनी टीका करत अतुल भातखळकर यांचं डोकं फिरलं आहे. डोकं ठिकाणावर नाही. एखादा व्यक्ती कुठून आल्या त्याची नोंद नसावी का? पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात काय चुकीचे बोलले मुख्यमंत्री? माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हीच भूमिका कित्येक वर्षांपूर्वी मांडली आहे, असं शिवसेना आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या.

Exit mobile version