Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव खुर्द शिवारात बिबट्याची दहशत; वासराचा फडशा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळगाव खुर्द येथील शिवारात रात्री बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याचे आज सकाळी उघडकीस आल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील जळगाव खुर्द येथील शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे. १५ मार्च रोजी सकाळी गावातील एका कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडल्याचे दिसून आले होते. यानंतर शेतात काही जणांना बिबट्या दिसून आला होता. यात एक मादी आणि दोन बछडे यांचा समावेश असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली होती.

यामुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांनी याबाबत वन खात्याकडे तक्रार केली होती. यात बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. तथापि, याबाबत कार्यवाही करण्यात आली नसल्याने शेतात अधून-मधून बिबट्याची मादी व बछडे दिसत होते. यातच आज सोमवारी सकाळी शेतात विलास वामन कोळी यांच्या गाईच्या वासराचा बिबट्याने फडशा पाडल्याचे दिसून आले. यामुळे परिसरात पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरले आहे.

जळगाव खुर्द शिवारात दररोज शेकडो शेतकरी आणि शेतमजूर कामासाठी एकटे-दुकटे जात असतात. अनेक जण रात्री-अपरात्री सुध्दा शेतात जातात. तथापि, परिसरात बिबट्याचा संचार असल्याने लोक आता शेतात जाण्यासाठी घाबरू लागले आहेत. यामुळे या भागात किमान बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप तरी लावावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version