Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१ रूपयात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी अमन मित्तल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी एक रूपयात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवावा. अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ पर्यंत विमा अर्ज ऑनलाईन दाखल करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.

खरीप हंगाम पीक विमा योजनेच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी विमा कंपनीचे दोन कृषी चित्ररथ जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ३१ जुलै पर्यंत हे चित्ररथ जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांना ऑडियो क्लिपद्वारे पीक विम्याची माहिती देणार आहेत. जिल्हाधिकारी अमन मित्तल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी या दोन्ही ‘प्रधानमंत्री पीक विमा रथांना’ हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जिल्हाधिकारी श्री.मित्तल बोलत होते.

सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकांकडून केवळ १ रुपया भरून पीक योजनेत सहभागाची नोंदणी करावी. सेवा केंद्रांनी अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास पीक विमा कंपनी कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

जिल्हयातील खरीप ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमुग, तीळ, मुग, उडीद, तूर, कापूस, मका या अधिसुचित खरीप पिकांसाठी ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे या विमा कंपनीच्या सहकार्याने विमा योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा हप्ता एक रूपया वजा जाता उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य शासनामार्फत अदा करण्यात आलेला आहे. अंतिम मुदतीत शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा. असे आवाहन श्री.चलवदे यांनी केले आहे.

Exit mobile version