Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रसिद्ध लेखक श्रीधर माडगुळकर यांचे निधन


पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगुळकर यांचे सुपूत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. बुधवारी खासगी रुग्णालयात त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

श्रीधर माडगूळकर यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४७ रोजी जन्म झाला. त्यांनी १९७० साली ‘जिप्सी’ या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करुन अनेक नवीन लेखकांना पुढे येण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे ‘धरती’ व साप्ताहिक ‘मायभूमी’ या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम केले. त्यांच्या अनेक कथा महाराष्ट्रातील अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांची ‘आठी आठी चौसष्ट’ ही कादंबरी राजकीय क्षेत्रात मैलाचा दगड समजली जाते. गदिमांच्या आठवणींवरील ‘मंतरलेल्या आठवणी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. गोवा येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आठव्या ‘शेकोटी’ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

Exit mobile version