Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव एमआयडीसीत आयुर्वेदीक प्रॉडक्टच्या नावाखाली बनावट दारूचा कारखाना !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शीतपेय तयार करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या कारखान्यात चक्क बनावट देशी दारू विक्री तयार करण्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला असून यात मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगावच्या औद्योगिक वसाहत परिसरातल्या के सेक्टरमध्ये मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट या नावाने कंपनी सुरू होती. यात विविध फ्लेवर्सचे शीतपेय तयार करण्यात येत असल्याचे वरकरणी दाखविण्यात आलेले होते. प्रत्यक्षात येथे टँगो संत्रा या ब्रँडची बनावट देशी दारू तयार करण्यात येत होती. यासाठी येथे रसायनांपासून ते पॅकेजींगची सर्व सामग्री असून यातून मोठ्या प्रमाणात प्रॉडक्शन करून ते वितरीत करण्यात येत आहे.

दरम्यान, याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाला मिळाली. या माहितीची खातरजमा करून आज जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सकाळी मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट या कंपनीवर छापा टाकण्यात आला. यात येथे बनावट दारू तयार करणारी सर्व यंत्रणा तसेच सामग्री आढळून आली. यात तब्बल ५० लक्ष ५९ हजार रूपयांची सामग्री जप्त करण्यात आली असून हा आकडा वाढणार असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरूध्द कार्यवाही सुरू झालेली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर ही कारवाई करण्यात आली. हा छापा पहाटे अडीच वाजेच्या सुमारास टाकण्यात आला.

दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या कंपनीला भेट देऊन या कार्यवाहीबाबतची माहिती जाणून घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version