Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपहरण नव्हे तर बनाव ! : प्रियकरासोबत विवाह करून ‘ती’ तरूणी हजर

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातून काल तरूणीचे अपहरण करण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली असतांना तीच तरूणी आज आपल्या प्रियकरासह विवाह करून पोलीस स्थानकात हजर झाल्याची घटना घडली आहे.

फैजपूर शहरातून काल एका २२ वर्षांच्या तरूणीचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ही तरूणी आपल्या आजीसह सकाळी जात असतांना प्रांताधिकारी कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरून जात असतांना हा प्रकार घडला. यात पंजाबी ड्रेस घालून आलेल्या तरूणाने महिलेच्या चेहर्‍यावर स्प्रे मारून तिच्या नातीला घेऊन पळ काढला होता. या संदर्भात संबंधीत तरूणीच्या आजीच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असतांनाच आज या प्रकरणात एक ट्विस्ट आला. अपहरण झालेली तरूणी ही आज आपल्या प्रियकरासह विवाह करून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. अर्थात, काल अपहरणाचा बनाव करून ही तरूणीच आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचेही यातून अधोरेखीत झाले आहे.

Exit mobile version