Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सध्याचे केंद्र सरकार इंग्रजांप्रमाणेच अत्याचारी- नाना पटोले ( व्हिडीओ)

फैजपूर, ता. यावल सचिन गोसावी/संदीप होले । इंग्रजांविरूध्द स्वातंत्र्याचा लढा सुरू असतांना फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. तर आता देखील कृषी कायद्यांचे दहन याच पवित्र भूमित करण्यात येत असल्याचे नमूद करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकार हे इंग्रजांप्रमाणेच अत्याचारी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज एक दिवसाच्या जिल्हा दौर्‍यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत केंद्रीय कृषी कायद्यांच्या दहन आंदोलनासह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेे. याप्रसंगी काँग्रेसच्या प्रदेशा कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे, माजी खासदार उल्हासदादा पाटील, आ. शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी नाना पटोले म्हणाले की, फैजपुरात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. येते ब्रिटीशांच्या विरूध्दचा लढा सुरू असतांना अधिवेशन घेण्यात आले होते. याच पवित्र भूमित आम्ही केंद्र सरकारच्या काळ्या कृषी कायद्यांचे दहन केले. हे तिन्ही कायदे शेतकर्‍यांच्या विरूध्द असून दिल्ली येथे सहा महिन्यांपासून आंदोलन सुरू असतांनाही पंतप्रधान त्यांच्याशी बोलण्यासाठी तयार नाहीत. अशा अत्याचारी पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे कायद्यांच्या मसुद्याचे दहन केले असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.

सध्या कोरोनाची आपत्ती थोडी कमी झाली असल्यामुळे आपण जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेलो आहोत. फैजपूर येथे काँग्रेसचे पन्नासावे अधिवेशन घेण्यात आले होते. तेव्हाचा लढा हा इंग्रजांच्या विरूध्द होता. तर सध्याचे केंद्र सरकार हे इंग्रजांप्रमाणेच अत्याचारी असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. देशात सरकार विरूध्द संतप्त भावना असून मोदी सरकारला २०२४ साली जनता धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी केला. तर, महागाईने सर्वसामान्य नागरिक हे त्रस्त झालेले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मार्च महिन्यात देशात सर्वत्र चिता पेटल्या असतांना पंतप्रधान हे पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारात लागले होते. सरकारच्या या दंडेलशाहीच्या विरोधात काँग्रेस लढत आहोत.

नाना पटोले यांनी स्वबळाबाबत भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, आम्ही आधी स्वबळाची भाषा नक्कीच केली आहे. मात्र सध्याची स्थिती लक्षात घेता देशात अतिशय निराशाजनक स्थिती आहे. यामुळे सरकारच्या विरोधात आवाज उठविणे ही प्राथमिकता आहे. राहूल गांधी यांनी पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात तिसर्‍या लाटेच्या उपाययोजनांची माहिती दिली. यामुळे काँग्रेसची भूमिका ही देशातील जनतेच्या सुरक्षेची आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत नाना पटोले म्हणाले की, ७३व्या घटना दुरूस्तीमुळे पाच वर्षानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक एक दिवसही पुढे ढकलली जात नाही. मात्र एका परिपत्रकाचा संदर्भ घेऊन संविधानाचे उल्लंघन करण्यात आले. याबाबत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर दोन वर्षाआधी कोर्टाने निर्णय दिला. मात्र तत्कालीन फडणवीस सरकारने मागासवर्ग आयोग नेमला नाही. ओबीसींना आरक्षण नाकारण्याचे पाप हे त्याच सरकारचे असल्याचा आरोप पटोले यांनी केला. ओबीसींना संपविण्याचे काम भाजप करत असल्याचेही ते म्हणाले. तर, काँग्रेसला सोडून देशात कोणतीही आघाडी निर्माण होऊ शकत नसल्याचे देखील नाना पटोले यांनी याप्रसंगी केला. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

खालील व्हिडीओत पहा नाना पटोले नेमके काय म्हणालेत ते ?

Exit mobile version