Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बांधकाम कामगारांच्या मोर्चाने दणाणले फैजपूर शहर !

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वाळू रितसर उपलब्ध करून द्या यासह विविध मागण्यांसाठी आज फैजपूर येथील श्रमिक कोहीनुर कामगार संघटना व एम मुसा जनविकास सोसायटी संचलित असंघटित गवंडी कामगार संघटनेतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर गवंडी कामगारांचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

गेल्या काही महिन्यापासून गिरणा तसेच जिल्ह्यातील सर्व नदी पात्रातून वाळू काढण्यावर बंदी आहे. याचा मोठा फटका बांधकामांना बसला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिने पासून नंदुरबारची वाळू येत आहे. या वाळूला परवानगी आहे तर गिरणा वाळूला का नाही ? असा संतप्त सवाल शासनाला आंदोलन कर्त्यांनी केला आहे. नंदुरबारची वाळू जास्त दराने मिळत असल्याने शेकडो बांधकाम बंद पडले आहे. असंख्य कामगार बेरोजगार झाले आहे. त्यांच्या कुटुंबावर उपामारीची वेळ आली आहे.

या अनुषंगाने वाळू लिलाव करण्यासाठी शासन, लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी गवंडी कामगार, मजुरांच्या विविध मागण्यांसाठी हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाळू माती सुरू करा, बेरोजगार कामगारांना रोजगार द्या… या घोषणांनी प्रांत कार्यालय परिसर दणाणून निघाले होते. हा मोर्चा फैजपूर शहरातील सावदा रोडवरील मल्लतनगर पासून सकाळी अकरा वाजता अंकलेश्वर- बर्‍हाणपूर राष्ट्रीय महामार्ग वरील सुभाष चौक, डॉबाबासाहेब आंबेडकर (छत्री चौक) मार्गे प्रांत कार्यालय असा काढण्यात आला.

सर्वप्रथम शहरातील सुभाष चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकल्या नंतर श्रमिक कोहीनुर कामगार संघटनेचे अध्यक्ष शाकिर मलिक, भीम आर्मीचे रमाकांत तायडे यांनी संबोधित केले. तसेच माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, माजी उपनगराध्यक्ष कलिम खा मण्यार, पीआरपी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख आरिफ, एमआयएमचे तालुका अध्यक्ष डॉ.मुदस्सर नजर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अनवर खाटीक, नितीन भावसार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख शाकिर यांनी यावेळी मोर्चाला पाठिंबा दिला. यावेळी फैजपूर येथील कामगार, ठेकेदार, इंजिनिअर यांनी प्रांत कार्यालयासमोर काही वेळ ठिया आंदोलनही केले. अशी माहिती श्रमिक कोहेनुर कामगार संघटना अध्यक्ष शाकिर मलिक यांनी दिली आहे.

दरम्यान या कामगार मोर्चात रावेर व यावल तालुक्यातील श्रमिक कोहीनुर कामगार संघटना, कामगार तसेच इंजिनिअर, ठेकेदार, प्लंबर पेंटर, इलेक्ट्रिशियन, फिटिंग, वीट कारागीर, विट भट्टे, पीओपी, सुतार,वेल्डर, रेती डीलर यांचासह सर्व बांधकाम व्यवसाय सोबत जोडले गेलेले व्यावसायिक, व्यवसाय धारक, कामगार, ठेकेदार मोठया संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकर्‍यांचे निवेदन प्रांत कार्यालयाचे अव्वल कारकून चौधरी यांनी स्वीकारले. दिलेल्या निवेदनातील मागण्यांचा सकारात्मक विचार न झाल्यास आठ दिवसानंतर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Exit mobile version