मराठा आरक्षणाबद्दल फडणवीसांनी दिशाभूल केली – एकनाथराव खडसे (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने १०२वी घटनादुरुस्ती केल्यानंतर राज्याला मराठा आरक्षणाबद्दल काही करण्याचे अधिकारच राहिले नाहीत, हे त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना माहिती होते, तरीही त्यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जे काही केले तो निवडणूक स्टंट होता. त्यांनी राज्याची दिशाभूल केली असा आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी केला 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथराव  खडसे पुढे म्हणाले की , राज्यात मराठा आरक्षणासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन प्रयत्न करीत आहेत. मराठा समाजाला सहज आरक्षण मिळणार नाही हे केंद्र सरकारने १०२ वी घटनादुरुस्ती केल्यानंतरच स्पष्ट झाले होते. हे त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनाही माहिती होते त्यामुळे आता फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी मोदी सरकारकडे आग्रह धरला पाहिजे. त्या काळात मराठा मोर्चे निघाले त्यांना सामोरे जाण्यासाठी फडणवीसांनी कुण्या संकटमोचकांना सोबत घेतले  होते खरे तर हा पक्षविरहित प्रश्न आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण स्वतंत्रपणे आणि हक्काने मिळावे अशी आमचीही भूमिका आहे , असेही ते म्हणाले.

राज्यात शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे आणि त्याच पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटील व किशोर पाटील यांनी महावितरणच्या विरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन करणे हा औचित्यभंगाचा प्रकार आहे. त्यांनी आपल्या ऊर्जामंत्र्यांशी व मुख्यमंत्र्यांशी आपल्या मुद्द्यांवर बोलून मार्ग काढण्याची भूमिका घेतली पाहिजे. या दोन्ही आमदारांची अशी आंदोलनाची भूमिका न पटणारी आहे, असेही ते म्हणाले. 

जिल्हा दूध संघात होणारी नोकर भरती पारदर्शक व संगणकावर परीक्षा घेऊनच होईल, एका नव्या पैशाचाही गैरव्यवहार होणार नाही. याची काळजी घेण्याच्या सूचना मी संचालक मंडळाला दिल्या आहेत. कुणालाही काहीच पैसे देण्याची गरज नाही, अनुभवी लोकांना प्राधान्य देण्यात येणार आहे  , असेही  त्यांनी सांगितले 

एका कार्यक्रमात वाघाशी दोस्ती करायला तयार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटलांचे धोरण आणि भूमिका कधीच निश्चित नसते असे सांगत जास्त बोलणे एकनाथराव खडसे यांनी टाळले. 

तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन सोहळ्यात मार्गदर्शन  करताना एकनाथराव खडसे म्हणले की, या पक्षाच्या स्थापनेपासून सगळ्यांनी परिश्रम केले. पक्षाने अनेक चढ उतारही पाहिले. या कालखंडात राज्यात सर्वत्र पक्ष पोहचला. आता आमचे सगळ्यांचे ध्येय राज्यात व पुढे देशात पक्ष क्रमांक एकचा पक्ष बनला पाहिजे हे आहे. त्यासाठी आपल्याला एकत्र राहून काम करायचे आहे. आमचा पक्ष व प्रत्येक कार्यकर्ता संघटित राहिला पाहिजे. पुढे जिल्ह्यात सहकारी संस्था व नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाची ताकद दाखवून आतापासून तयारी पाहिजे. आमचे कार्यकर्ते सर्वत्र आहेत असे म्हणण्यापेक्षा निवडणुकांमध्ये यश मिळाले पाहिजे. आमदारांची संख्या वाढवण्यासाठी आतापासून कामाला लागले पाहिजे तरच चांगले यश मिळेल कार्यकर्त्यांना मार्गदर्शनाची गरज असते त्यांना सक्रिय ठेवून जो पदाधिकारी ज्या पदावर आहे. त्याने त्या पदाला न्याय दिला पाहिजे, पक्षाचे काम सातत्याने सुरु राहिले पाहिजे. राज्यात सत्ताधारी असल्याने जनतेच्या समस्या ही आपली जबाबदारी आहे हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे मोदी सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलने झाली पाहिजेत मी तर म्हणेन की कार्यकर्त्यांनी जनभावनेला वाट करून देणारी आंदोलने उभारताना पक्षाच्या आदेशाची वाट पाहू नये राज्यभर पक्ष विस्ताराचा शरद पवार यांचा आम्हाला या वर्धापदिनानिमित्त संदेश मिळालेला आहे असेही ते म्हणाले . 

यावेळी दिवंगत नेते हाजी गफ्फार मलिक यांची आठवण करत नाथाभाऊंनी आज ते आपल्यात  नसल्याची उणीव तीव्रतेने जाणवत असंल्याचेही आवर्जून सांगितले.

Protected Content