Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हयातील निवृत्ती वेतन धारकांसाठी ई-कुबेर प्रणालीची सुविधा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील निवृत्ती वेतन धारकांसाठी जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे मासिक पेन्शन हे यापुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व बँकेतून थेट पेन्शन धारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी दिली.

पेन्शन जमा करण्यासाठी जी बँक घेतली असेल त्याच खात्यातील आयएफएससी कोडनुसार ही पेन्शन जमा होईल. जर काही पेन्शनधारकांनी या कोषागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर बँक खाते इतर जिल्ह्यात तसेच इतर बँकेत बदल करून घेतले असेल तर अशा पेन्शन धारकांचे पेन्शन जमा होण्यास अडचणी निर्माण होतील.

तरी ज्या पेन्शन धारकांनी परस्पर बँक व बँक खात्यात बदल करून घेतले असतील त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल तेच खाते सुरू ठेवावे. भविष्यात पेन्शन बाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पेन्शन धारकांची राहील. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्ती धारकांचे माहे मार्च-2024 या महिन्याचे मासिक पेन्शन हे दिनांक 10 एप्रिल, 2024 पर्यंत जमा होईल. याची सर्व पेन्शनधारकांनी नोंद घ्यावी, असे जळगावचे जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version