Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात राज्य बालनाट्य स्पर्धेस उत्साहात प्रारंभ

जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘लहान मुलांतील सुप्त कलागुणांचा विकास होऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा’ या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात संपन्न झाले.

यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, अरुंधती अभिषेक पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे व स्पर्धेचे परीक्षक गोविंदा गोडबोले (सांगली), नवीनी कुलकर्णी (मुंबई), सुषमा मोरे (नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

नटराज पूजनाने स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक करताना स्पर्धेचे समन्वयक दिपक पाटील यांनी सांगितले की, “बालरंगभूमीचा विचार अधिक गांभीर्याने घेऊन भविष्यात तरी बालरंगभूमी समृद्ध करायची असेल, तर पालकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देताना त्यांच्या शारीरिक आरोग्याकडे जसं लक्ष देतो, तसं त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी बालरंगभूमी ही गरज आहे. मुलांचा केवळ आय.क्यू. न वाढवता इ.क्यू. (इमोशनल कोशंट) वाढवणेदेखील गरजेचे आहे, हे ओळखणे आवश्यक आहे. नाटक सादर करणं हा तर व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहेच. पण चांगली बालनाट्यं पाहून एक सुजाण प्रेक्षक घडवणं ही काळाची गरज आहे. टीव्ही, कम्प्युटरला चिकटलेली, कार्टुनच्या मोहपाशात अडकलेली मुलं भविष्यात समाजाला धोकादायक बनू शकतात. कार्टुनच्या अतिरेकाचे दुष्परिणाम परदेशात मनोविकारतज्ज्ञांना चिंताजनक वाटू लागले आहेत.”

उद्‌घाटनपर भाषणात महापौर जयश्रीताई महाजन यांनी सांगितले की, “बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या कायापालटाला सुरुवात झाली असून, रंगमंचाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कलावंतांना अपेक्षित असणाऱ्या सर्व सोयीसुविधांयुक्त असे नाट्यगृह देण्याचा आमचा मानस असून, त्यादृष्टीने आमचे सर्व नियोजन सुरु आहे.”

यावेळी अरुंधती अभिषेक पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, बालनाट्याच्या माध्यमातून बालकांचा व्यक्तिमत्व विकास होत असतांना, त्यांचे प्रसंगावधान, स्टेजडेअरींग वाढते. तसेच त्यांची स्मरणशक्ती अधिक तल्लख होते. उद्याचा सर्वगुणसंपन्न सुजाण नागरिक या मुलांमधूनच घडणार आहे. त्यासाठी प्रत्येक पालकाने मुलांबरोबर पालकांनीही बालनाट्यं पाहिली पाहिजेत आणि बालरंगभूमीवर नेमकं काय दाखवलं जात आहे, त्याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होतो आहे, हे गांभीर्याने बघितलं पाहिजे. शाळा कलाविकासाबाबत काही करत नाही म्हणून गप्प बसण्यापेक्षा आपल्या मुलांना हे कलाप्रकार शिकवून, दाखवून त्यांना कलाकार किंवा एक रसिक म्हणून तयार करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन वैशाली पाटील यांनी केले.

आज महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सात संघांनी आपले सादरीकरण केले. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगावचे अमोल संगीता लिखित दिपक महाजन दिग्दर्शित ‘सहल’, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे रमेश पवार लिखित संदीप घोरपडे दिग्दर्शित ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं’, भारती शिक्षण संस्था जळगाव यांचे विभावरी मोराणकर लिखित सुनिता पाटील दिग्दर्शित ‘भूत’, हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट दोंडाईचा यांचे विश्वंभर पुरी लिखित मनोज ठाकूर दिग्दर्शित ‘निर्बुध्द राजाची नगरी’, लोकमंगल कलाविष्कार धुळे यांचे प्रकाश पारखी लिखित सुजय भालेराव दिग्दर्शित ‘एप्रिल फुल’, बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसोली यांचे प्रांजल पंडीत लिखित विनय अहिरे दिग्दर्शित ‘कॉपीबहाद्दर’, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ यांचे अमोल संगीता लिखित अलका भटकर दिग्दर्शित ‘गुणांच्या सावल्या’ ही बालनाट्ये सादर झालीत.

बुधवार, दि.२३ रोजी सकाळी १०.३० वाजेपासून सात बालनाट्यांचे सादरीकरण होणार आहे. या बालनाट्य स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून, या माध्यमातून लहान मुलांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे व स्पर्धेचे जळगाव समन्वयक दिपक पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version