Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परवानगी दिली नाही तरी २ सप्टेंबरपासून मशिदी उघडणारच – खा. इम्तीयाज जलील

मुंबई प्रतिनिधी । सरकारने परवानगी दिली नाही तरी २ सप्टेंबर पासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याची माहिती आज एमआयएमचे खासदार इम्तीयाज जलील यांनी दिली आहे. यामुळे आता त्यांनी थेट सरकारला आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.

विविध क्षेत्रांमध्ये अनलॉक होत असतांना प्रार्थनास्थळं पुन्हा उघडण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी वारंवार होत आहे. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने विरोध केला तरी २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याचं म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

या वाहिनीशी बोलतांना जलील म्हणाले की, आम्ही आमच्या वतीने अल्टिमेटम देत आहोत. १ तारखेला गणपती विसर्जन आहे. हिंदू बांधवांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. १ तारखेपासून सगळी मंदिरं उघडा आणि २ तारखेपासून आम्ही आमच्या सगळ्या मशिदी उघडणार. काही योग्य तर्क असतील तर ऐकू अन्यथा परवानगी दिली नाही तरी २ तारखेपासून सर्व मशिदी उघडू हे सरकारमधील लोकांना मला सांगायचं आहे, असं आव्हानच इम्तियाज जलील यांनी दिलं आहे. यावेळी त्यांनी याची सुरुवात आपणच औरंगाबादमधून करणार असल्याचंही सांगितलं.

दरम्यान, खासदार इम्तीयाज जलील यांच्या या घोषणेमुळे ते राज्य सरकारशी थेट दोन हात करण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version