Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठात युवा मानसरंग क्लबची स्थापना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रत्येक क्षेत्रात वाढत असलेली स्पर्धा, वाढता दबाव, कुटुंबात परस्पर संवादाचा असलेला अभाव, व्यायामाकडे असलेले दुर्लक्ष आणि फास्ट फुडच्या आहारी जाण्याची वाढती संख्या यामुळे तरूण पिढीचे मानसिक आरोग्य ढासळत असून यातून बाहेर पडण्यासाठी स्वत: मधील क्ष्मता ओळखा, इतरांसोबत स्वत:ची तुलाना करू नका. आणि कोणत्याही दबावाखाली काम करू नका. असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकादमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात युवा मानसरंग क्लबची स्थापना करण्यात आली असून या क्लबच्या कक्षाचे उद्घाटन करतांना प्रा. माहेश्वरी बोलत होते. परिवर्तन संस्था, सातारा यांच्या सहकार्याने हा कक्ष कार्यान्वित झाला. या उद्घाटन प्रसंगी मंचावर अकादमीच्या योगिनी मगर, परिवर्तन संस्थेचे कृतार्थ शेगावकर, प्रा. संजिवनी भालसिंग, प्रा. उमेश गोगडीया यांची उपस्थिती होती.

प्रा. माहेश्वरी आपल्या भाषणात म्हणाले की, युवकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. शारीरिक स्वास्थ असेल तर मानसिक आरोग्य चांगले राहते. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता आव्हानांना सामोरे जायला हवे. आपल्यातील क्षमता ओळखून मार्ग निवडावा असे ते म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणात भावनिक बुध्दीमत्ता आणि विश्लेषणाची तयारी असणारा विद्यार्थी तयार करण्याचा हेतू आहे. विद्यापीठात स्थापन होणाऱ्या मानसरंग कक्षा मार्फत विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न होईल अशी अपेक्षा कुलगुरूंनी व्यक्त केली. प्रास्ताविकात कृतार्थ शेगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करून भावनिक प्रथमोपचाराचे काम या क्लबच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून जे सहा केंद्र निवडले आहे. त्यामध्ये या विद्यापीठाचा समावेश असून काही प्राध्यापकांना प्रशिक्षण देवून मानसरंग संवादक म्हणून ते तयार झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे समोपदेशन केले जाईल अशी माहिती दिली. यावेळी प्रा. अतुल बारेकर, प्रियंका पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा महाजन यांनी केले. प्रा. उमेश गोगडीया यांनी आभार मानले.

Exit mobile version