एरंडोल व पारोळा तालुक्यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारा-आ. चिमणराव पाटील

पारोळा प्रतिनिधी | कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता पारोळा आणि एरंडोल तालुक्यांसाठी ऑक्सीजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

एरंडोल व पारोळा तालुक्यांसह संपूर्ण विश्वात कोरोना विषाणूचा हाहाकार सर्वत्र पसरलेला आहे. दैनंदिन रुग्ण संख्येत व मृत्यू दरात मोठी वाढ होतांना दिसत आहे. एरंडोल व पारोळा तालुक्यातील मृत्यू दरात होत असलेली वाढ ऑक्सिजन अभावीच होत असून पारोळा व एरंडोल येथील रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी जळगाव किंवा धुळे अश्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. 

रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यामुळे बरीचशी रुग्ण ऑक्सिजन अभावीच दगावतात. तसेच शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड असून देखील ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णास रुग्णालयात दाखल केले जात नाही. त्यामुळे रुग्णांची मोठी वणवण होत आहे. सध्या राज्यासह संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने जिल्ह्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्लांटवर ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी किमान २ दिवस प्रतीक्षेत राहावे लागत आहे. 

पारोळा व एरंडोल तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणाने वाढ होत असून ऑक्सिजनची आवश्यकता असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणवर आहेत. त्यामुळे  पारोळा व एरंडोल तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणे अत्यंत गरजेचे आहे. एरंडोल व पारोळा तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारल्यास ऑक्सिजन अभावी दगावनाऱ्या व ऑक्सिजनसाठी वणवण होणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. याची आमदार चिमणराव पाटील यांनी दखल घेवून जिल्हाधिकारी यांना पत्रान्वये उपरोक्त मागणी केलेली आहे.

 

Protected Content