Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Erandol news

एरंडोल प्रतिनिधी । नातेवाईकांकडे अंतयात्रेसाठी दुचाकीने जात असतांना भरधाव ट्रकच्या धडकेत पळासखेडा येथील वृध्द जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर पातरखेडे येथे सकाळी घडली. याबाबत पळासखेडे गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत एरंडोल पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, महादु महारु पाटील (महाडिक) रा. पळासखेडे ता. पारोळा हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ एटी ०६९४) स्प्लेंडर या दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरून एरंडोलकडे जात होते. पातरखेडे फाट्याजवळ (ओआर १५ आर ०७९५) क्रमांकाचा मालट्रक भरधाव वेगाने ओव्हर टेक करत येऊन दुचाकीला समोरून धडक दिली. त्यात महादु पाटील हे रस्त्यावर खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैदयकीय अधिकारी डॉ.राहुल पाटील यांनी ते मृत झाल्याचे घोषित केले. दरम्यान ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला.

जवळपास १५ दिवसांपासून एरंडोल ग्रामीण रुग्णालयाची १०८ सुविधा बंद पडल्यामुळे शुक्रवारी मृताच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात संताप व्यक्त केला. १०८ सुविधा मिळाली असती तर माझे काका वाचले असते, असे संताप जनक उद्गार पळासखेडे येथील अविनाश पुंडलिक पाटील यांनी व्यक्त केला. याप्रकरणी एरंडोल पो.स्टे.ला भाग 5 गुरनं75/19 भादवि कलम 279, 304 (अ), मोटर व्हेईकल ऍक्ट 184 प्रमाणे दाखल आहे. स.फौ.प्रदीप चांदोलकर व अरुण मोरे हे तपास करीत आहे. महादु पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

Exit mobile version