Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सराफाला लुटणारे चौघे अटकेत

एरंडोल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील विखरणजवळ सराफा व्यावसायिकाला लुटून पळ काढणार्‍या चौघांना पोलिसांनी गजाआड केले असून एक आरोपी फरार झाला आहे.

राजेंद्र विसपुते या सोन्या-चांदीच्या व्यापार्‍यावर हल्ला करून साडेनऊ लाख रूपयांचे दागिने लुटून नेल्याची घटना दिनांक १६ रोेजी घडली होती. माळपिंप्री येथील रहिवासी राजेंद्र विसपुते यांचे रवंजा येथे सोने-चांदीचे दुकान आहे. १६ रोजी विसपुते हे दुकान बंद करून घराकडे जात असताना विखरण मार्गावरील टेकडीजवळ पाच जणांनी त्यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांच्यावर चाकूचे वार करून जखमी केले. त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केले होते. विशेष म्हणजे चोरट्यांची एक दुचाकी बिघडल्यामुळे ते विसपुते यांच्याच दुचाकीने पसार झाले होते.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यातून दिगंबर उर्फ डिग्या रवींद्र सोनवणे (रा. भोकर), विशाल आतून सपकाळे (रा. विठ्ठलवाडी, जळगाव), विशाल लालचंद हरदे व संदीप राजू कोळी (दोघे रा. चौगुले प्लॉट, जळगाव) या चौघांना अटक केली. तर आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे हा फरार आहे.

ही कारवाई अमळनेर विभागाचे पोलिस उपअधिक्षक अधीक्षक राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली.

Exit mobile version