नियमांच्या अधीन राहूनच पद्मालयाच्या मंदिरात दर्शनाची सुविधा

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मालय हे उद्यापासून खुले होणार असून विश्‍वस्तांनी आजच यासाठी सज्ज तयारी केली आहे. भाविकांना येथे नियमांचे पालन करूनच गणरायाचे दर्शन घेता येणार आहे.

कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष आदेशपारित करीत १७ मार्चपासुन शाळा,महाविद्यालये व देवस्थाने बंद ठेवले होते. यानुसार पद्मालय देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान शासनाने राज्यातील सर्व धार्मिकस्थळे दर्शनासाठी खुले केले असल्याने एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थानाचे श्री क्षेत्र गणपती मंदिर सुध्दा सोमवार दि.१६ पासून भाविकभक्तांसाठी खुले करण्यात येत आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान श्री गणेशाचे दर्शन भाविकांना घेता येईल. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये,यासाठी श्री क्षेत्र गणपती मंदिर विश्‍वस्त मंडळाच्यावतीने शासनाच्या आदेशानुसार सद्यपरिस्थितीला अनुसरून देवस्थान दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. यात ६० वर्षापेक्षा जास्त वयस्कर असलेल्या भक्तांना व लहान मुलांना मंदिरात प्रवेश नाही दिली जाणार नाही. दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मास्क अनिवार्य असुन सॅनिटाईज केल्यानंतरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. दर्शन रांगेत शासनाने ठरवुन दिलेल्या सामाजिक अंतराचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक असेल. नियमांच्या पालनांसाठी मंदिर व्यवस्थापनातर्फे सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. भाविक भक्तांचे आरोग्य सुदृढ रहावे हाच उद्देश विश्‍वस्त मंडळाचा असून भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विश्‍वस्त मंडळाने केले आहे.

Protected Content