Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चक्क पोलीस ठाण्यातूनच पळविले डंपर !

एरंडोल प्रतिनिधी | तालुक्यातील कासोदा पोलीस स्थानकाच्या आवारात जप्त करून उभे करण्यात आलेले डंपर वाळू तस्कराने पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या संदर्भात माहिती अशी की, कासोदा परिसरातील फरकांडे चौफुलीवर पोलिसांनी १९ डिसेंबर रोजी एमएच- २०, सीटी- ९२८४ या डंपरवर कारवाई केली होती. डंपरमध्ये तीन ब्रास वाळू होती. तर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. ही वाळू गिरणा नदीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते.

यामुळे स्थानिक पोलिसांनी डंपरचालक गगन छगन तडवी (रा. उत्राण) याच्यासह डंपर ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. पोलीस स्थानकात तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असतानाच तडवीचा सहकारी अमीन हुसेन शेख (रा.उत्राण) याने थेट पोलिस ठाण्यातून डंपर पळवून नेला. डंपरमधील वाळू तळई रोडवरील सत्कार हॉटेलच्या समोरील बेकरीच्या मागे खाली केली. यानंतर डंपर सोडून पळून गेला.

या प्रकरणी गगन छगन तडवी आणि अमीन हुसेन शेख या दोघांविरुद्ध कासोदा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक नरेश ठाकरे तपास करत आहेत.

Exit mobile version