Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘एपिरॉक मायनिंग इंडिया’मुळे सहा गावांच्या शेतकर्‍यांची पाणी प्रश्नावर मात !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एपीरॉक मायनिंग इंडिया कंपनीच्या मदतीने सहा गावांनी पाणी टंचाईवर मात केली आहे.

एपीरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड यांच्या अमृतधारा प्रकल्पाच्या अंतर्गत,नाम फाऊंडेशन, भूजल अभियान, व मौजे राजमाने, पोहरे, कळमडू, दस्केबर्डी ,खेडी ,शिदवाडी ता.चाळीसगाव गावांच्या एकत्रित लोक सहभागातून व गिरणा पाटबंधारे विभागाच्या सहकार्याने १२ नंबर पाठचारी व त्याच्या सब चार्‍या असे साधारण २१ किलो मीटर अंतर पाठ चारीची साफ सफाई, खोलीकरण ,चढ वरील दगड फोडून पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा व पाण्याची लेव्हल मेन्टेन ठेवणे अशी कामे करण्यात आली. याचा प्रत्यक्षपणे ५०० ते ७०० हेक्टर क्षेत्राला फायदा देणारे प्रथम टप्प्यातील कामाने अखेर शिदवाडी पर्यंत गिरणा पाटबंधारे विभागाच्या मदतीने पाणी पोचले.

साधारण १९८२ मध्ये गिरणा डाव्या कालव्याचे काम झाले होते त्यावेळेस या सर्व पाटचार्‍या झाल्या होत्या. मात्र हेड पासून टेल पर्यंतच्या साधारणत १०-११ किलोमीटरच्या पूर्ण अंतरात भौगोलिक दृष्ट्या बराचसा भाग हा चढ उताराचा असल्याने टेलच्या गावांना पाणी पोहोचण्यास अडचणी येत होत्या. आणि त्यामुळे शेवटी कधीच पाणी पोहचले नव्हते.

शासनाकडून नवीन चारी झाल्यानंतर यातील काही गावात हवे त्या प्रमाणात पाणी पाठचारीच्या माध्यमातून सिंचनासाठी गेल्या अनेक वर्षापासून पोचत नव्हते. आणि या मुळे रब्बी पिकांसाठी शेतकर्‍यांची पाण्यासाठी वणवण व्हायची व दुर्भिक्षिता निर्माण व्हायची. पहिलं पीक तर पावसाच्या पाण्यावर यायचे,पण रब्बीच्या पिकाला पाणी अपूर्ण पडल्यामुळे बी-बियाणे, खत आणि शेतकर्‍याने केलेले कष्ट वाया जायचे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत चालला आहे. या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी शेतकर्‍यांनी स्वतः धडपड केली.

चाळीसगाव तालुक्यात भूजल अभियान या लोक चळवळीत शेतकर्‍यांनी भूजल प्रमुखांना या कामाच्या महत्वाबद्दल व येणार्‍या अडचणी बद्दल सांगितल्या नंतर त्याची माहिती व अडचण भूजल टीमने नाम फौंडेशन ला कळवली. त्यातून नाम व एपिरॉक मायनिंग इंडिया या कंपनी ने तात्काळ या कामाला मंजुरी देऊन ३ डिसेंबर रोजी या कामाला सुरुवात करण्यात आली होती. या पाटचारी च्या कामामुळे राजमाने, शिदवाडी, दस्केबर्डी, खेडी, पोहरे व कळमडू असे ६ गावे अवलंबून आहेत ज्यातून प्रत्यक्षपणे ५०० ते ८०० हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

६ गावे एकत्र येवून या गावांनी आप आपसात भूजल वारकर्‍यांनी व भूजल दिंडी प्रमुखांनी या सर्व गावात समन्वय निर्माण केला. गावागावात ग्रामसभा घेऊन अडीअडचणी सोडून हे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले या कामात वरील सर्व गावांनी सहभाग नोंदवला. ज्यातून आज आपल्याला अखेरच्या गावापर्यंत पाणी पोचलेले पाहायला मिळत आहे. कदाचित प्रथमच शासनाचा कुठलाही शासनाचा आर्थिक सहभाग न घेता ,६ गावांनी एकत्रपणे लोक सहभाग, एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड,नाम फाउंडेशन व भूजल अभियान यांच्या मदतीने काम झाले.

या कामात सर्व शेतकर्‍यांनी खूप मेहनत घेतली, त्यासोबतच गिरणा पाटबंधारे विभागाचे देवेंद्र अग्रवाल साहेब, हेमंत पाटील, आर.आर.वाघ शेळके साहेब व सर्व पाटकरी व कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड,नाम फाउंडेशन,भूजल अभियान टिमचे पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी आभार मानले.

Exit mobile version