Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मयत गजानन राणे यांच्या कुटुंबियांचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी केले सांत्वन

मुंबई प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे जमावाच्या जबर मारहाणीत वायरमन गजानन राणे यांचा मृत्यू आणि उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे जखमी होण्याची अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगून गजानन राणे यांचे सुपुत्र शुभम राणे यांच्याशी दूरध्वनीवर बोलून त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला,  अशी  माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

डॉ. राऊत पुढे म्हणाले, राणे कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली जाईल. तसेच उप कार्यकारी अभियंता धामोरे यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधून दिलासा दिला. दूरध्वनीवर बोलताना श्री. धामोरे यांनी सर्व सबस्टेशनवर सीसीटीव्ही लावण्याची विनंती केली असून त्यावर सकारात्मक विचार केला जाईल. 

पीडित कुटुंबाची भेट घेऊन या विषयावर प्राथमिक माहिती घेण्याच्या व पुढील कारवाई करण्याच्या सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना दिले आहेत. ते लवकरच महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडखे यांना जळगावमध्ये पाठवणार आहेत. पिडीत कुटुंबातील सदस्य आणि सर्व संबंधितांशी बोलून अहवाल तात्काळ पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

“हा अहवाल आल्यानंतर तो गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सादर करून या प्रकरणी सखोल तपासासाठी विनंती करणार आहे. तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांना आवश्यक त्या सूचना देण्याची विनंतीही करणार आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही मी देतो.” असेही डॉ. राऊत यावेळी म्हणाले.

 

Exit mobile version