Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवीन विद्युत प्रकल्पात स्थानिकांना रोजगाराची संधी – व्ही.थांगा पांडीयन

WhatsApp Image 2019 11 10 at 8.05.15 PM

भुसावळ, प्रतिनिधी | तालुक्‍यातील दीपनगर येथील १×६६० नवीन प्रकल्पांमधील तक्रारीबाबत भुसावळ तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रकल्पाचे कार्यकारी संचालक व्ही.थांगा पांडीयन यांची नवीन प्रकल्पाच्या कार्यालयात भेट घेऊन नवीन विद्युत प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे आदींनी चर्चा केली.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रकल्पाचे कार्यकारी संचालक व्ही.थांगा पांडीयन यांच्यासोबत चर्चा करतांना स्थानिक लोकांना नवीन प्रकल्पातील काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळण्याबाबत सीएसआर फंडातून प्रत्येक गावातील कामांमध्‍ये स्वतंत्र निविदा करणे, टेंडर बरोबर सुरू करणेबाबत तसेच स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्याने काम देण्याबाबत विचारविनिमय केला. दीपनगर येथील नवीन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी तत्‍कालीन ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी भुसावळ तालुक्यातील प्रकल्पबाधित जनतेसह सर्व तालुक्यातील जनतेला प्रकल्प सुरू झाल्यावर रोजगार उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सीएसआर निधीतून परिसरातील १७ गावांमध्ये कामे प्रस्तावित आहे. या गावातील कामांचे स्वतंत्र टेंडर होणे अपेक्षित असतांना सिव्हिल विभागाचे अधिकारी मुख्य अभियंता अनंत देवतारे यांनी मात्र स्थानिक कंत्राटदारांना या कामांपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र केले आहे. त्यांनी गावातील कामे स्वतंत्ररित्या न काढता सर्व कामे एकत्रित काढण्याचा घाट घातला आहे. एकत्रित टेंडर रद्द करून प्रत्येक गावातील काम हे स्वतंत्ररित्या करण्यात यावे. भविष्यात स्पर्धा होणार नाही असे कमी रकमेचे टेंडर काढून ते योग्यरित्या करण्यात यावे, त्याच बरोबर बंद केलेली कोटेशन पद्धत सुरू करण्यात यावी. त्यामुळे नवीन कंत्राटदारांना काम मिळण्यास सुलभता होईल व त्यांना रोजगार उपलब्ध होईल असे सांगितले. यावेळी नवीन प्रकल्पाच्या संचालकांसह मुख्य अभियंता रोकडे, स्थापत्य विभागाचे मुख्य अभियंता अनंत देवतारे, अधीक्षक अभियंता मुंडे, इंगळे तसेच शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हा युवा सेना अधिकारी प्रवीण पाटील, भुसावळ शहर प्रमुख नीलेश महाजन, रमाकांत चौधरी, आकाश पाटील या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा घडून प्रकल्‍प संचालक व अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला या वेळी दिली.

Exit mobile version