Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर्मचार्‍यांना बदलीसाठी विनंती करता येणार, आग्रह नाही !

नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवरील सुनावणीत कुणीही कर्मचारी हा बदलीसाठी फक्त विनंती करू शकतो, आग्रह नाही असा महत्वाचा निकाल दिला आहे.

सरकारी नोकरी असो वा खासगी नोकरी आपल्यापैकी अनेक कर्मचारी बदलीसाठी प्रयत्न करतात. सरकारी नोकरीत बदलीसाठी एक निश्चित प्रक्रिया आणि नियम असतात. खासगी क्षेत्रात मात्र बदलीवरून अनेकदा मालक आणि कर्मचा-यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळते. उत्तर प्रदेशातील अशाच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बदलीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार इच्छित स्थळी बदली करून घेण्यासाठी कर्मचार्‍यांंना विनंती करता येईल, मात्र, विशिष्ट ठिकाणी बदलीचा आग्रह करता येणार नाही, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.

सोमवारी झालेल्या या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला आहे. अमरोहामधील एका महाविद्यालयामध्ये याचिकाकर्त्या महिला मानसशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून काम करतात. मात्र त्यांना नोएडामध्ये पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये बदली करून हवी होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने यासंदर्भातली त्यांची याचिका
१४ सप्टेंबर २०१७ मध्ये फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला.

एखाद्या ठिकाणी बदली करणे किंवा न करणे यासाठी कर्मचारी आग्रह करू शकत नाही. हा निर्णय नोकरी देणाऱयांवर अवलंबून असतो. गरजेनुसार ते या बदल्या करत असतातफ, असे न्यायालयाने यावेळी म्हटले आहे. दरम्यान, याचिकाकर्त्या प्राध्यापिकेने नोएडामधील ज्या महाविद्यालयात बदली करून मागितली होती त्याच ठिकाणी त्यांनी २००० ते २०१३ ही १३ वर्षे नोकरी केली होती. त्यावरूनदेखील न्यायालयाने त्यांना सुनावले.

Exit mobile version