Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उमाळा ग्रामपंचायतीत साडेपाच लाखांचा अपहार; तात्कालिन ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील उमाळा ग्रामपंचायतमध्ये अस्सल व बनावट पावती पुस्तकाद्वारे वसूल केलेल्या ५ लाख ५८ हजार ५०६ रुपयांचा बँकेत शासकीय भरणा न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन अपहार करणाऱ्या संदीप चंद्रभान निकम या तात्कालिन ग्रामसेवकाविरुद्ध गुरूवारी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, संदीप चंद्रभान निकम याच्याकडे १३ मार्च २०२३ ते ३ जुलै २०२३ या दरम्यान जळगाव तालुक्यातील उमाळा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक पदाचा पदभार देण्यात आला होता. त्या दरम्यान ग्रामसेवक संदीप निकम याने अस्सल पावती पुस्तकाद्वारे पाणी पुरवठा वसुलीचे ६०० रुपये, ग्रामनिधीमध्ये ४ लाख १४ हजार ४०० रुपये आणि बनावट पावती पुस्तक वापरुन १ लाख ४३ हजार ५०६ रुपये असे एकूण पाच लाख ५८ हजार ५०६ रुपये वसूल केले होते. मात्र ती रक्कम त्याने शासकीय भरणामध्ये न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. या प्रकरणी तत्कालीन सरपंच संगीता खडसे व कर भरणाऱ्या सविता चौधरी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. त्यानंतर वरिष्टांच्या आदेशानुसार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेश इंगळे यांनी गुरूवार १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तात्कालिन ग्रामसेवक संदीप निकम याच्याविरुद्ध अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गणसे करत आहेत.

Exit mobile version