Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकनाथराव खडसे यांनी घेतली संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट

0179a461 6144 4632 8f23 fed434869427

 

जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यात सैनिक शाळा सुरू करावी तसेच आगामी काळात भुसावळ तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथे भेट देण्याचे आमंत्रण देण्यासाठी माजी महसूलमंत्री आ.एकनाथरावजी खडसे यांनी नुकतीच देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी , खासदार रक्षाताई खडसे या देखील उपस्थित होत्या.

 

या भेटी दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघात 5 विधानसभा क्षेत्र जळगाव जिल्ह्यात व 1 विधानसभा बुलढाणा जिल्ह्यात आहे. या भागात 2 ऑर्डनन्स फॅक्टरी, एक पूर्ण तोफखाना ब्रिगेड यांना पूरक मेस, छावणी बोर्ड यासारखे अनेक संरक्षण प्रतिष्ठाने आहेत. महाराष्ट्र राज्य हे भौगोलिक दृष्ट्या मोठे असून देशाच्या संरक्षणासाठी अनेक योद्धे शाहिद झालेले आहेत. भौगोलिक दृष्ट्या एवढे मोठे राज्य असूनही राज्यात सातारा येथे एकाच ठिकाणी सैनिक शाळा आहे. ही शाळा तिच्या दृष्टीने परिपूर्ण योगदान करत आहे, परंतु महाराष्ट्र राज्य भौगोलिक दृष्ट्या मोठे असल्याकारणाने नवीन तरुणांना आकर्षित करण्यास कमी पडत आहे.

 

तरुणांना देशाच्या संरक्षणा साठी आकर्षित करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे एक नवीन सैनिक शाळा स्थापन करण्यात यावी, या साठी आवश्यक तेवढी जमीन पाणी, वीज, रस्ते व रेल्वे या इतर पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध आहेत. रावेर लोकसभा क्षेत्रात दोन ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत. या ठिकाणी पॅकिंग स्वरूपाची कामे होतात. परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असूनही स्थानिक तरुणांना ठेकेदारी पद्धतीने रोजगार उपलब्ध होत आहे. पिनाका सारखे प्रोजेक्ट उन्नतीकरण करून विस्तारीकरण केल्यास किंवा इतर कोणतेही तांत्रिक उत्पादन मेक इन इंडिया प्रकल्प अंतर्गत सुरू करण्यासाठी आवश्यक ती जमीन व पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

 

या भागात सुमारे 3000 हुन अधिक निवृत्त पेंशनधारी सैनिक आहे, त्यांच्या पेन्शन संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संरक्षण निवृत्ती वेतनवितरण कार्यालय व पेन्शन अदालत भुसावळ येथे स्थापन करण्यात यावे. तसेच या 3000 निवृत्त सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यविषयक तक्रारीसाठी जळगाव गाठावे लागते, त्यांच्या साठी ECHS पॉलीक्लिनिक उघडावे. या क्षेत्रातील अनेक तरुण सैन्यात भरती होण्यासाठी जीवापाड मेहनत करत असतात त्यांच्यासाठी वारंवार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी. सैनिक कल्याण केंद्र स्थापन केल्यास या क्षेत्रातील निवृत्त सैनिकांना दिलासा लाभेल.यासारख्या अनेक कल्याणकारी योजना निवृत्त सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरू करता येतील याकडे मा.संरक्षण मंत्री यांचे लक्ष माजी महसूलमंत्री आ.एकनाथरावजी खडसे व खासदार रक्षाताई खडसे यांनी वेधले.

Exit mobile version