Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाथाभाऊंचा ‘तो’ वाढदिवस आणि ‘हा’ वाढदिवस !

जळगाव प्रतिनिधी । घरकूल प्रकरणात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. या सर्व घडामोडींमध्ये त्यांच्या दोन वाढदिवसांच्या अनोख्या योगायोगाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मे २०१६ या महिन्यात तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्याविरूध्दची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली. यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. परिणामी काही दिवसांमध्येच खडसे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातील पडद्याआड घडामोडी गतीमान झाल्या. याचे दृश्य परिणाम तीन महिन्यात दिसून आले. घरकूल गैरव्यवहार प्रकरणी कारागृहात असणारे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा जामीन अर्ज अनेकदा फेटाळण्यात आला होता. मात्र त्यांना न्यायालयाने खडसेंच्या वाढदिवसाला म्हणजेच २ सप्टेंबर २०१६ रोजी जामीन मंजूर केला होता. तर ४ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांची कारागृहातून जामीनावर मुक्तता करण्यात आली. जैन समर्थकांनी सुरेशदादांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांच्यासाठी कमानी उभारण्यात आल्या. तर त्यांच्या समर्थकांनी जबरदस्त आनंदोत्सव साजरा केला. या जल्लोषात तेव्हा मंत्रीपदावरून पायउतार असणारे आमदार खडसे आणि त्यांच्या समर्थकांना खिजवण्याचा प्रयत्न कुणापासून लपून राहिला नाही. खडसेंच्या वाढदिवसाला त्यांचे कट्टर विरोधक जैन यांची मुक्तता हा अत्यंत गुढ असा योगायोग तेव्हा प्रचंड चर्चेचा विषय बनला होता.

आता योगायोगाची बाब अशी की, एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस एक दिवसावर आला असतांना सुरेशदादा जैन आणि त्यांच्या तेव्हाच्या समर्थकांना जोरदार हादरा देणारा निकाल न्यायालयाने दिला आहे. यामुळे २०१६ साली बॅकफुटवर असणार्‍या नाथाभाऊ समर्थकांचे चेहरे तीन वर्षांनी आनंदाने फुलल्याचे दिसून येत आहेत. अर्थात, तीन वर्षापूर्वीचा खडसे यांचा वाढदिवस आणि या वर्षीच्या वाढदिवसाच्या वातावरणात जमीन-आस्मानचे अंतर असेल हे देखील स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version