Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुलांविषयी बोलतांना एकनाथ शिंदे यांना अश्रू अनावर !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ”मी कधी कुटुंबासाठी वेळ दिला नाही. शिवसेना हेच माझे कुटुंब होते. या कुटुंबासाठी मी आयुष्य वेचले आणि जेव्हा माझी दोन मुले माझ्यासमोर गेली तेव्हा मी कोलमडून पडलो. . .!” असे सांगतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधीमंडळात अश्रू अनावर झाले. अत्यंत सदगतीत होत त्यांनी आपण पक्षासाठी नेमके काय केले हे सांगितले.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्‍वासदर्शक प्रस्ताव जिंकला. ठरावाच्या बाजूने १६४ मते मिळाली. यानंतर विविध नेत्यांनी भाषणे केल्यानंतर शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभाराचे भाषण केले. यात त्यांनी आपल्या अतिशय खडतर अशा वाटचालीचा आढावा प्रस्तुत केला. ते म्हणाले की, माझ्या घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. अशात वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी शिवसैनिक बनलो. लागलीच आनंद दिघे यांच्या संपर्कात आल्यावर अठराव्या वर्षी शाखाप्रमुख झालो. यानंतर मी शिवसेनेसाठी स्वत:ला वाहून घेतले. अगदी नगरसेवकपदासाठी पाच वर्षे वाट पाहिली. मात्र दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू केली.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, शिवसेनेसाठी झपाट्याने काम करत असतांना एका अपघातात माझी दोन मुले माझ्या समोरच गेलीत. आणि मी अक्षरश: उन्मळून पडलो. यावेळी आनंद दिघे यांनी मला धीर दिला. मी राजकारण सोडून देण्याचा विचार केला. अशा वेळी दिघे यांनी एकदा मला यातून सावरत पुन्हा सक्रीय होण्याचे सांगितले. आणि मी पुन्हा नव्याने उभा राहिलो ते कधीही मागे न पाहण्यासाठी ! हे सांगत असतांना त्यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. काही क्षण थांबल्यानंतर ते पुन्हा बोलू लागले.

आपण सत्तेसाठी बाहेर पडलो नसून बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि जनतेच्या कामांसाठी आपण वेगळा मार्ग पत्करल्याचे त्यांनी सांगितले. आपली नैसर्गिय युती ही भाजपसोबत असतांना दोन्ही कॉंग्रेस सोबत अनेक अडचणी होत होत्या. यातच वागणुकही चांगली मिळत नव्हती. यामुळे सोबत पक्षातील ४० आणि अपक्ष १० असे ५० आमदार आल्याने सत्तांतर घडल्याचे शिंदे म्हणाले. आम्ही गद्दारी नव्हे तर उठाव केल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले ते खरेच असल्याची पुष्टी देखील त्यांनी जोडली.

Exit mobile version