Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसेंवर होणार शस्त्रक्रिया : दमानिया म्हणतात खोटेपणाचा कळस !

मुंबई प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना बॉंबे रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली आहे. तर हा सर्व प्रकार म्हणजे खोटेपणाचा कळस असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. या व्यवहारात मदत केल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना ईडीने गेल्या आठवड्यात अटक केली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी पीएमएलए न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना गुरूवारपर्यंत कोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.

या पार्श्‍वभूमिवर, आज सेशन कोर्टात एकनाथराव खडसे यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी माहिती दिली की, खडसे यांना बॉंबे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तर मंदाताई खडसे यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला असून यावर आता सुनावणी होणार आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी त्यांच्यावर क्रिटीकल अर्थात तातडीची आवश्यकता असणारी शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती दिल्याच्या कारणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या की हा सर्व खोटेपणाचा कळस आहे. खडसे यांनी अलीकडेच अपंगत्वाचे प्रमाणापत्र घेतल्याचा उल्लेख करून त्यांनी जोरदार टीका करण्याचे ट्विट केले आहे.

Exit mobile version