Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खामखेडा येथे योजनेच्या माहितीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथे योजनेच्या माहितीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मार्गदर्शन केले.

डॉ शामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गाव समुहाची निवड करण्यात आली आहे यामध्ये हरताळा, कोथळी, सालबर्डी, वढवे, चांगदेव, खामखेडा या गावांचा समावेश आहे. या अनुषंगाने संबंधीत योजनेची माहिती देण्यासाठी खामखेडा येथे सभा घेण्यात आली. माजी महसुल कृषी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली.

यावेळी गट अधिकारी डी आर लोखंडे , प्रकल्प समन्वयक प्राची पाटील, बाजार समिति सभापती निवृत्ती पाटील , जि.प. सदस्य निलेश पाटील, वैशालीताई तायडे , वनिताताई गवळे , प स विकास पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस संदिप देशमुख, तोताराम भोलाणे, चंद्रकांत भोलाणे, प्रदीप साळुंखे,योगेश कोलते, पांडुरंग नाफडे,प्रमोद सोनवने उपस्थित होते
यावेळी मार्गदर्शन करताना एकनाथराव खडसे म्हणाले की, रुरबन मिशन अंतर्गत १५ कोटी निधी प्राप्त होणार आहे यातुन ५०% निधी या गावात पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या कामांवर खर्च करण्यात येणार आहे उर्वरित निधी मधून गावात कौशल्य विकास प्रशिक्षण, कृषी प्रक्रिया स्टोरेज आणि गोदाम, मोबाईल आरोग्य युनिट, शाळा सुधारणा, उच्च शिक्षण सुविधा, स्वच्छता, नळाद्वारे पाणी पुरविणे, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन, गाव अंतर्गत गटारी, गाव अंतर्गत रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतूक, गॅस जोडणी, डिजिटल साक्षरता व नागरिक सेवा केंद्रे यावर खर्च करण्यात येणार आहे.

याचबरोबर एकनाथराव खडसे यांनी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी (पोखरा )योजने विषयी माहिती दिली. याशिवाय, अटल विश्‍वकर्मा सन्मान योजने विषयी माहिती देवुन या योजने मध्ये गावातील कामगार वर्गाला नोंदणी करण्याचे आवाहन केले. दरम्यान, यावेळी आमदार निधी अंतर्गत पाच लाख रुपये खर्चाच्या सामाजिक सभागृहाचे आ एकनाथराव खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. निंभोरे यांनी सूत्रसंचालन केले तर ग्रामसेवक इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले.

Exit mobile version