एकनाथराव खडसेंना विधानपरिषदेवर मिळणार संधी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या सदस्यांची यादी प्रलंबीत असल्याने एकनाथराव खडसे यांची आमदारकी देखील टांगणीला लागलेली आहे. यामुळे आता त्यांना २० जून रोजी होणार्‍या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे संधी मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. असे झाल्यास नंतरच्या मंत्रीमंडळ विस्तारात नाथाभाऊंचा समावेश होणार असल्याचा विश्‍वास त्यांचा समर्थकांना वाटू लागला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या मुलीस तिकिट दिले. चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केल्यानंतर भाजपमधील एका गटाने विरूध्द काम केल्याचा जाहीर आरोप एकनाथराव खडसे यांनी केला. यानंतर भाजपवर आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. जानेवारी २०२१ मध्ये एकनाथराव खडसे यांच्या नावाचा समावेश असणारी १२ विधानपरिषद सदस्यांच्या नामनिर्देशनाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविण्यात आली. मात्र त्यांनी या यादीवर आतापर्यंत देखील निर्णय घेतलेला नाही. साहजीकच विधानपरिषदेवर जाण्याची खडसेंची संधी यामुळे हुकल्याचे मानले जात होता. मात्र आता २० जून रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत त्यांची राष्ट्रवादीतर्फे विधानपरिषदेत वर्णी लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादीतर्फे विधानपरिषदेवर पाठविण्यात येणार असून काल रात्री याबाबत शरद पवार यांच्याशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. खडसे यांच्या माध्यमातून विधानपरिषदेत भाजपच्या आक्रमणाला तोंड देणारा खंदा नेता सोबतीला येणार असल्याने त्यांचे तिकिट पक्के मानले जात आहे.

दरम्यान, विधानपरिषदेवर गेल्यानंतर एकनाथराव खडसे यांना मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात येणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. किंबहुना त्यांचा मंत्रीमंडळात समावेश होणारच अशी खडसे समर्थकांना आस लागल्याचे दिसून येत आहे. अर्थात, नेमके काय होणार ? याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

Protected Content