Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बियाणे व खते मुबलक उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न : ना. गुलाबराव पाटील

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येत्या खरीप हंगामात सोयाबीन, कापूस आणि तुर पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. शेतकर्‍यांना बियाणे, खते मुबलक उपलब्ध होण्याबरोबर पिक कर्ज सहज मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात शनिवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार धीरज लिंगाडे, संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, श्वेता महाले, कृषि सचिव एकनाथ डवले, प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आदी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील पाटील म्हणाले, बुलढाणा जिल्ह्याला सुमारे १५०० कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा बँक पिक कर्ज देऊ शकत नसल्याने ही जबाबदारी राष्ट्रीय बँकांवर राहणार आहे. त्यामुळे एक लाख ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना सीबिलची अट राहणार नाही. शेतकर्‍यांना पेरणी पूर्वी कर्ज पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्ह्यात ४० टक्के क्षेत्रावर सोयाबीन, कापूस आणि तूर पिकाची पेरणी होणार आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरणी करू नये. पावसाअभावी उगवण झाली नसल्यास बियाणे टंचाईची शक्यता निर्माण होते. टंचाईमुळे बोगस बियाणे, खते बाजारात दाखल होतात. तसेच इतर उत्पादन खरेदी करण्याची सक्ती होत असल्यास तक्रारीची दखल घेण्यात यावी. भरारी पथक नेमून नियमित कारवाई करण्यात यावी.

कृषि विभागाने शेतकर्‍यांना उपयुक्त सूचना आणि मार्गदर्शन करावे. कृषि विकासासाठी योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या करावी. शेततळे, शेडनेट यासारख्या योजनांचा लाभ देण्यात यावा.शेतकर्‍यांनी हवामान पद्धतीनुसार शेती करण्यावर भर देऊन पिक पद्धतीत बदल करावा. पिक विम्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नुकसान भरपाईची मदत वेगवेगळ्या टप्यावर असून लवकरच याचा लाभ देण्यात येणार असल्याचे ना. गुलाबराव पाटील पाटील यांनी सांगितले. यावेळी कृषि विभागाच्या योजनेतील लाभार्थींना लाभाचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version