Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सात्रीकरांचे पुतळा दहन आंदोलन तूर्त स्थगित

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सात्री गावाच्या रस्त्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे मान्यतेसाठी पाठवला असून येत्या आठवड्यात अंतिम निर्णय प्राप्त करून निर्णय कळवला जाईल असे आश्वासन देण्यात आल्याने सात्रीकरांनी पुतळा दहनाचे आंदोलन स्थगित केले आहे.

अमळनेर तालुक्यातील सात्री गावाला जायला पावसाळ्यात रस्ताच नसल्याने ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळत नाही. आणि याचमुळे तीन वर्षात तिघांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे यांनी मयतांचे पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जळगाव येथे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनात सर्व अधिकारी व सात्री गावच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस मुख्य अभियंता खांडेकर, उपअभियंता जितेंद्र याज्ञीक, निम्न तापी प्रकल्प कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी, पुनर्वसन व पुनर्विलोकन समिती सदस्य महेंद्र बोरसे, रवींद्र बोरसे, प्रकाश बोरसे, शालीग्राम पाटील, सुनील बोरसे, खंडेराव मोरे, मगन भिल, श्रीराम बागुल, दीपक मोरे, आसाराम बागुल, मनोहर बोरसे, राजेंद्र ठाकरे, पाडळसरे जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी, हेमंत भांडारकर, गोकुळ पाटील हजर होते.

जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता य. का. भदाणे यांनी तापी महमंडळाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून सात्री गावाकडून निंभोरा गावाकडे शेतरस्ता वजा पाटचारी निरीक्षण रस्ता ४ कोटी ५५ लाख ३९ हजार रुपयांच्या रस्त्याची मान्यता देण्यात यावी असे पत्र २२ रोजी सादर केले. आणि आठ दिवसात मान्यता मिळवून देतो असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्याने पुतळा दहन आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

Exit mobile version